Wednesday, April 25, 2012

मैत्री जिवाभावाची..............


मैत्री जिवाभावाची
 
खरंच मैत्रीचा बंध अतूट असतो. बघा ना दुडूदुडू चालणारं बाळ आपल्याच वयाइतक्‍या मुलाकडे बघून खुदकन हसते. त्याने दिलेली ती मैत्रीची हाक असते. हळूहळू मोठं होत असताना आपल्याच वयाच्या मुलांमध्ये आपण रमायला लागतो. इथूनच खरी मैत्रीच्या नात्याला सुरवात होत असते.

माझं बालपण महाडजवळील बिरवाडी या छोट्याशा खेड्यात गेले. आजूबाजूला खूप मित्रमैत्रिणी होत्या. खेळायला मोठे अंगण होते. अशीच माझी बालपणीची एक मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला एक प्रसंग आठवतो. आमचे घर कौलारू, मातीच्या भिंती व चूल अशा पद्धतीचे होते. संध्याकाळी चुलीला पातेरे घालून म्हणजे लाल मातीने चूल सारवून घ्यायची व पुढचा भाग शेणाने सारवायचा अशी पद्धत होती. संध्याकाळी माझी शिकवणीला जायची गडबड असायची. माझी मैत्रीण नयना माझ्याकडे यायची. माझे आवरले नसेल तर ती स्वतः जमीन सारवायला घ्यायची, जेणेकरून आम्ही दोघी वेळेवर शिकवणीला पोचू. एवढी निर्वाज्य मैत्री आता बघायलाही मिळत नाही. आम्ही दोघी मिळून खळाळत्या पाण्यात खडकावर बसून अनेक स्वप्नं बघितली होती. आता आमची गाठभेट कार्यक्रमापुरतीच व फोनवरच होते.

नंतर शाळेत आम्हा अगदी जवळच्या मैत्रिणींचा असा चौघींचा ग्रुप होता. शाळेत, शिकवणीला सगळीकडे आम्ही एकत्रच जायचो. आम्हाला कॉलेजसाठी आमच्या गावापासून महाडला जावे लागे. चौघी एकाच एसटीने जायचो. कॉलेजपासून अकाउंट्‌स क्‍लास गावात तीन ते चार किलोमीटर लांब होता. पण चौघी एकत्रच चालत जायचो. त्या काळी मुली टू-व्हीलर वापरत नव्हत्या. एकदा आम्ही गावात खरेदीला गेलो व परत घरी जायला म्हणून एस.टी. स्टॉपवर आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझी छत्री हरवली आहे. खरंतर ती छत्री माझ्या चुलत बहिणीची होती. त्याने मला आणखीनच वाईट वाटले व रडू कोसळले. पण माझ्या मैत्रिणींनी मला खूप धीर दिला. आम्ही सगळ्या परत जिथे जिथे गेलो होतो तिथे जाऊन आलो. अखेर एका दुकानात छत्री सापडली. त्या वेळचा मैत्रिणींचा आधार आजही फार मोलाचा वाटतो.

आमचे कापडदुकान असल्यामुळे दुकानचा माल आम्ही महाडहून आणत असू. मी कॉलेजला गेल्यावर येताना कापड खरेदी करत असे. माझी एक ना एक तरी मैत्रीण बरोबर असे. क्‍लासपासून दुकान लांब होते. तिथपासून गच्च भरलेल्या कापडाच्या पिशवीचा एक बंद माझी मैत्रीण धरत असे. त्या वेळी रिक्षा करणेही परवडत नसे. माझ्या मैत्रिणींची सांपत्तिक स्थिती चांगली होती. तरी त्या मला जी मदत करत ती फार मोलाची होती. आजही आम्हा चौघींची मैत्री अबाधित आहे. कुठल्याही वेळी, कुठेही काही निमित्ताने भेटलो तरी लग्नाआधीच्या सगळ्या आठवणी उचंबळून येतात. दोनच महिन्यांपूर्वी यांतील एका मैत्रिणीचा फोन आला. दोघींनाही वेळेचे भान राहिले नाही. सरत्या काळातील आठवणी, ज्या गोष्टी करायला लग्नाआधी जमले नाही त्या करण्याची धडपड व वयानुसार होत गेलेले बदल यावर मनमुराद गप्पा झाल्या. अखेर माझ्या मुलाने "आई बॅडमिंटनला मला जायचे आहे' अशी आठवण करून दिल्यावर आमचा आठवणींचा ओघ थांबला.

नंतर लग्न झाल्यावर नवीन ओळखी झाल्या. नवऱ्याचे मित्रमंडळ, मुलाच्या शाळेसंदर्भातल्या, खेळाच्या इथल्या अशा अनेक मैत्रिणी मिळत गेल्या. असेच माझे एकदा मोठे ऑपरेशन झाले. डॉक्‍टरांनी घरी जायला परवानगी दिली व गाडीतून जा म्हणाले. त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले. ती तिची चारचाकी गाडी घेऊन मला न्यायला आली. अशा वेळी आपण आपल्या मैत्रिणीला हक्काने सांगू शकतो.
माझ्या प्रेग्नसीच्या काळात मला गाडी चालवायची नव्हती. तेव्हा माझी ऑफिसमधील मैत्रीण मला संध्याकाळी तिच्या गाडीवरून घरी सोडत असे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा लहान होती. अत्यंत काळजीपूर्वक गाडी चालवत असे. एवढेच नाही, तर तिने तिच्या आईला सांगून माझे डोहाळेजेवणही केले. खरंच ते दिवस आठवले तरी आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा मैत्रिणी मिळत गेल्या, याचा अपार आनंद होतो.

खरंच आपण आपल्या आयुष्याचा लांबचा पल्ला गाठत असतो. अशा वेळी सुख-दुःखात साथ द्यायला, वेळ पडलीच तर सावरायला, काही चुकत असेल तर सांगायला, आनंदात सहभागी व्हायला आपल्याला मित्रमैत्रिणी उपयोगी पडतात. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर मित्र-मैत्रिणींची फार गरज असते. मन मोकळे करण्याची ती एक जागा असते.

""मैत्री असावी जिवाभावाची
सुख-दुःखातील सहभागाची
हसताना हसणारी, अश्रूही पुसणारी
यशामध्ये पाठ थोपटणारी
आठवणीत रमून जाणारी.'' 
 
लेखिका -     
प्राची कर्वे
संदर्भ - सकाळ पेपर  

No comments:

Post a Comment