Wednesday, April 25, 2012

एका भाकरीची किंमत.........


एका भाकरीची किंमत
1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे.

एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. सर्वत्र पसरलेला नयनरम्य निसर्गाचा आनंद मिळत होता. आक्राळ-विक्राळ डोंगररांगा पाहून छातीत धडधड चालू होती.

जावळीचे चंद्रराव मोरे यांच्यामुळे वाघावळे गाव प्रसिद्ध आहे. शेजारी उचाट या गावी चंद्रराव मोरे यांचा राजवाडा आहे. त्याचे अवशेष पाहावयास मिळतात. कांदाट नदीवरून नाव पडलेले कांदाट गाव जवळच आहे. एकूण प्रदेश अतिदुर्गम अन्‌ हिरवागर्द. पूर्वी वाघांची वर्दळ या भागात होती, यावरून या गावास वाघावळे हे नाव पडले.

वाघावळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गोपाळराव मोरे हे अगत्यशील व्यक्तिमत्त्व. विनयता आणि शालीनता हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. आलेल्यांचे आगत-स्वागत उत्तम प्रकारे करीत. वाघावळे येथे वसतिगृहयुक्त सातवीपर्यंत शाळा आहे.

आम्ही तपासणीसाठी गेलो ते दिवस थंडीचे होते. नदीजवळ असल्यामुळे अधिकच गारवा लागत होता. माझी सोय वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात केली. रात्री जेवणानंतर पाणी प्यायल्याने हुडहुडी भरली. माझ्या सोबतीला एक शिक्षक होते. आम्ही स्वयंपाकघरातील चूल सतत पेटत ठेवली. लाकडे टाकत राहिलो. त्यामुळे अंगात ऊब येत होती. आम्ही शेकत-शेकत गप्पा मारीत होतो. खूप वेळ गेला. आता झोप येऊ लागली. आम्ही तेथेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी मला तापोळ्याला परत जायचे होते. साहेबांना तसे सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजता लॉंच होती. मी आवराआवर केली. पिशवी घेऊन मी निघालो, तोच माझ्यासोबतच्या शिक्षकांनी तिळाची चटणी आत भरलेली नाचणीची एक दुमडलेली भाकरी माझ्या पिशवीत घातली. ते म्हणाले "असू द्या, असू द्या; प्रवासात उपयोगी पडेल.'' पिशवी घेऊन बरोबर 10 वाजता नदीवर गेलो. लॉंच आली नव्हती. वाट बघत बसून राहिलो. माझ्याबरोबर तापोळ्यास जाण्यास फक्त एकच प्रवासी होता. झरेकर मामा. आम्ही दोघे लॉंचची वाट पाहत होतो. खूप वेळ गेला. लॉंच येण्याची लक्षणे दिसत नव्हती. दुपारचा एक वाजला. झरेकर मामांनी शिदोरी आणली होती. त्यांनी ती दह्याबरोबर खाल्ली. मला माझ्या पिशवीतील भाकरीची आठवण झाली. मी पिशवीतून भाकरी काढली. केवढे अप्रूप वाटले. मनातून शिक्षकाचे आभार मानले. नाचणीची भाकरी व तिळाची चटणी खाऊन नदीचे पाणी प्यालो. खूप तरतरी आली. मी निवांत झाडाखाली लॉंचची वाट पाहत राहिलो.

सकाळच्या लॉंचचा पंखा तुटल्यामुळे ती आली नाही. दुपारी 4 वाजता लॉंचची दुसरी फेरी आली. लॉंचचा आवाज आला अन्‌ माझ्या जिवात जीव आला. लॉंच किनाऱ्यावर लागली. लॉंचमधील 4-5 प्रवासी उतरले. वाघावळेच्या दिशेने चालू लागले. झरेकर मामा व मी लॉंचमध्ये बसलो. ठक्‌-ठक्‌-ठक्‌ लॉंच तापोळ्याच्या दिशेने सुरू झाली. ठिकठिकाणी प्रवासी लॉंचमध्ये बसत होते. लॉंच पुढे-पुढे जात होती. जंगल, पाणी, डोंगर झाडी मागे पडत होते. मी तापोळ्याला 5 वाजता पोचलो.

माझ्या मनात विचार चालू होते. त्या देव माणसाने माझ्या पिशवीत एक भाकरी व चटणी ठेवली नसती तर मला दिवसभर उपाशी राहावे लागले असते. भुकेने माझा जीव कासावीस होऊन गेला असता. एका भाकरीची किंमत मला त्या दिवशी कळली. मी त्या शिक्षकांना खूप-खूप धन्यवाद दिले. हा प्रसंग मी कधीच विसरणे शक्‍य नाही.
                                                          लेखक - आर. जे. गायकवाड 
                                                          संधर्भ - सकाळ पेपर 

No comments:

Post a Comment